रांजणगाव गणपती : प्रतिनिधी
रांजणगाव एमआयडीसी परिसरात अंमली पदार्थांच्या विरोधात पुणे ग्रामीण पोलिसांनी मोठी व धडक कारवाई करत तब्बल ६ लाख ८० हजार रुपये किमतीचा एमडी (अंमली पदार्थ) जप्त केला आहे. या प्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली असून त्याला न्यायालयाने २० मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
राज्यात सुरू असलेल्या ‘नशामुक्त भारत’ अभियानाच्या पार्श्वभूमीवर पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षक संदीप सिंह गिल यांच्या मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थांच्या विरोधात विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत अवैध अंमली पदार्थांची विक्री व वाहतूक रोखण्यासाठी पोलिसांकडून सतत कारवाई सुरू आहे.दि. १६ मार्च २०२६ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक रांजणगाव एमआयडीसी परिसरात गस्त घालत असताना पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली.
या माहितीनुसार, प्रशांत फक्कड मावळे रा (वय २४, रा. गणेगाव रोड संकल्प सिटी रांजणगाव गणपती , ता. शिरूर, जि. पुणे) हा आरोपी अंमली पदार्थ विक्रीसाठी येणार असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली.मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून सायंकाळी सुमारे ७.३० वाजण्याच्या सुमारास छापा टाकला.
या कारवाईत आरोपी प्रशांत मावळे याला ताब्यात घेण्यात आले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडून ३४ ग्रॅम वजनाचा एमडी अंमली पदार्थ, इलेक्ट्रॉनिक वजनकाटा तसेच इतर साहित्य असा एकूण ६ लाख ८० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.या प्रकरणी रांजणगाव पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्याच्या गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, प्राथमिक चौकशीत आरोपी प्रशांत मावळे याने सदर अंमली पदार्थ हा विकास दातीर (रा. माळीवाडी, सोनगाव, ता. राहुरी, जि. अहमदनगर) याच्याकडून घेतल्याचे निष्पन्न झाले आहे. पोलिसांकडून या प्रकरणाचा अधिक तपास सुरू असून संबंधित इतर आरोपींचा शोध घेण्यात येत आहे.
ही कारवाई पोलिस अधीक्षक संदीप सिंह गिल, अपर पोलिस अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय पोलिस अधिकारी प्रशांत ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अविनाश शिळीमकर, रांजणगाव पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक महादेव वाघमोडे तसेच त्यांच्या पथकाने संयुक्तरीत्या पार पाडली.अंमली पदार्थांच्या विरोधात अशीच कारवाई पुढेही सुरू राहणार असल्याचा इशारा पोलिस प्रशासनाने दिला आहे.
