Homeस्थानिक वार्तापुणेमुलांच्या जाणिवा विकसित करणाऱ्या सुसंस्कारक्षम कथा

मुलांच्या जाणिवा विकसित करणाऱ्या सुसंस्कारक्षम कथा

डॉ. कैलास दौंड हे बालसाहित्यातील एक आघाडीचे लेखक आहे. कथासंग्रह, कवितासंग्रह, कादंबरी आणि ललित लेखसंग्रह अशाप्रकारे त्यांची विविधांगी लेखन आहे. उसाच्या कविता या काव्यसंग्रहामधील त्यांची गोधडी ही कविता सहावीच्या पाठ्यपुस्तकात समाविष्ट आहे. अनेक नामवंत संस्थांचे त्यांना साहित्य पुरस्कार देखील प्राप्त आहेत. त्यांचा जाणिवांची फुले हा बालकथा संग्रह मुलांच्या भेटीला आला आहे. मुलांच्या वयानुरूप साजेसा असा बौद्धिक, मूल्यवर्धित आणि संस्कारक्षम कथांचा खजाना त्यांनी या कथासंग्रहाच्या माध्यमातून खुला केला आहे. मनोरंजनाबरोबरच ज्ञान आणि संस्कार मुलांमध्ये रुजवण्याचे कार्य त्यांच्या कथांमधून होत असते. हल्लीच्या पिढीला ज्ञान हे कुठेही मिळते, परंतु मुलांचा भावनिक व मानसिक विकास होण्यासाठी संस्कारक्षम गोष्टींची गरज असते. ती दौंड यांच्या जाणिवांची फुले या कथासंग्रहातून निश्चितपणे होत आहे हे या कथासंग्रहाच्या माध्यमातून मी खात्रीने सांगू इच्छितो. इतका हा कथासंग्रह बालचमुंसाठी मार्गदर्शक असा प्रेरणादायी स्रोत आहे. पशुपक्ष्यांची पाणपोई या कथेत गणेश आणि वैशालीच्या प्राणी व पक्षांविषयी असलेल्या निरागस भावनेचे वर्णन केले आहे. उन्हाळ्याच्या दिवसात पाणी पिण्यासाठी माणसांना टँकर किंवा पाणपोई ठेवली जातात. परंतु पशुपक्ष्यांची काय त्यांनी तहान लागल्यावर काय करायचं? हा विचार मनात आल्यावर बाबांच्या मदतीने दोघांनीही आपल्या शेतात पशुपक्ष्यांसाठी पाणपोई तयार केली. किशोरवयीन मुलांच्या भावनिक विकासाचे सुंदर चित्रण लेखकाने अत्यंत खुबीने केले आहे. आंब्याचा वाढदिवस या कथेत इयत्ता चौथीत शिकणाऱ्या वर्षाच्या वाढदिवसाला शेजारचे राम काका तिला वाढदिवसाची भेट म्हणून आंब्याचे एक छोटेसे रोपटे देतात. राम काकांनी दिलेली भेट तिलाच नाही तर तिच्या सर्व मित्रांना देखील आवडते. ती वर्षभर त्या रोपाची काळजी घेते त्याला पाणी देते. मग पुढच्या वर्षी ती आंब्याचा वाढदिवसच साजरा करते. सर्व मित्र-मैत्रिणींना राम काकांच्या मदतीने ती आंब्याची रोपे देऊन वाढदिवस साजरा करते. मुलांना पर्यावरणाचे महत्त्व समजण्यासाठी व पर्यावरणाविषयी आवड निर्माण होण्यासाठी दौंड यांच्या लेखणीतून साकार झालेली ही कथा बालचमुंसाठी पर्यावरण विषयक दृष्टिकोन निर्माण होण्यास निश्चित मदत होईल याची खात्री वाटते. तर सात रंगांचे गुपित या कथेत मधू आणि बाबांचा इंद्रधनुष्याबद्दल असलेला संवाद मुलांचे कुतूहल जागृत करणारा आहे. सर्वांनी पाहिलेल्या सात रंगाच्या इंद्रधनुष्याबद्दल बाबांनी मधूला सांगितलेला जीवन विषयक दृष्टिकोन विद्यार्थ्यांना प्रेरणा देणारा आहे. या कथासंग्रहात एकूण 16 कथांचा समावेश आहे. सर्वच कथा वाचनीय असून विद्यार्थ्यांच्या भावनिक व मानसिक विकासाला पूरक आहेत. किशोरवयीन मुलांवर ज्ञानाबरोबर संस्कार करण्याचे कार्य या कथा करतात. हल्लीच्या तंत्रज्ञानाच्या युगात ज्ञान हे कोणत्याही माध्यमातून मिळते परंतु संस्कार हे पुस्तकातूनच मिळणार हे निश्चित. त्यामुळे सुसंस्कारक्षम पिढी घडवण्यात कैलास दौंड यांच्यासह अनेक बालसाहित्यिकांचा वाटा महत्वपूर्ण आहे असे वाटते. नांदेड येथील साहित्यिक माननीय श्री. दत्ता डांगे यांनी त्यांच्या इसाप प्रकाशनामार्फत या पुस्तकाची साजेशी बांधणी केली आहे. पुस्तकाची गुणवत्ता आणि पानांचा दर्जा त्यांनी केलेल्या मेहनतीची साक्ष देतो. नांदेड जिल्ह्यातील प्रसिद्ध चित्रकार माननीय श्री. भास्कर शिंदे, यांनी विषयाला अनुरूप काढलेले आकर्षक मुखपृष्ठ व विषयानुरूप आतील चित्रे पुस्तकाच्या उंचीत मोलाची भर टाकते. किशोर मासिकाची कार्यकारी संपादक माननीय श्री. किरण केंद्रे यांनी या पुस्तकासाठी अभ्यासपूर्ण प्रस्तावना दिली आहे.

पुस्तकाचे नाव* – जाणिवांची फुले

लेखक* – डॉ. कैलास दौंड

प्रकाशक – इसाप प्रकाशन पुणे*

पृष्ठे – 80

मूल्य – 100 रु.

मुखपृष्ठ- – शिंदे, नांदेड.

समीक्षक – सचिन बेंडभर

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here
Captcha verification failed!
CAPTCHA user score failed. Please contact us!

ताज्या बातम्या