Homeताज्या बातम्यामहिलांना समान संधी मिळणे काळाची गरज- भारती शेवाळे

महिलांना समान संधी मिळणे काळाची गरज- भारती शेवाळे

तळेगांव ढमढेरे महाविद्यालयात महिला सबलीकरण कार्यशाळा.

तळेगांव ढमढेरे महाविद्यालयातील ज्ञानविस्तार कार्यक्रमांतर्गत महिला सबलीकरण कार्यशाळेत मार्गदर्शन करताना राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या पुणे जिल्हाध्यक्ष भारती शेवाळे. व्यासपीठावर पोलीस उपनिरीक्षक माधुरी झेंडगे, महेशबापू ढमढेरे यांच्यासह इतर मान्यवर.

तळेगांव ढमढेरे, दि. १५.पुरुषांच्या तुलनेत महिलांना देखील समान संधी मिळणे ही आजच्या काळाची गरज असून त्याबाबत समाज व्यवस्थेतील जबाबदार घटकांनी महिलांबाबत असलेली मानसिकता बदलावी असे प्रतिपादन राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या पुणे जिल्हाध्यक्षा भारती शेवाळे यांनी केले .तळेगाव ढमढेरे, ता. शिरूर येथील शिक्षण प्रसारक मंडळाचे साहेबराव शंकराव ढमढेरे महाविद्यालय व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा आजीवन अध्ययन व विस्तार विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या ज्ञानविस्तार कार्यक्रमांतर्गत दोन दिवसीय महिला सबलीकरण कार्यशाळा उद्घाटनप्रसंगी शेवाळे बोलत होत्या.

शिक्षण प्रसारक मंडळ व विद्या सहकारी बँकेचे विद्यमान संचालक महेश ढमढेरे समारंभाच्या अध्यक्षस्थानी होते. तळेगाव ढमढेरे- शिक्रापूर पोलीस स्टेशनच्या पोलीस उपनिरीक्षक माधुरी झेंडगे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ . अशोक नवले, मराठी विभागप्रमुख डॉ. संदीप सांगळे व केंद्र कार्यवाह डॉ . दत्तात्रय कारंडे, प्रा . अश्विनी पवार आदी याप्रसंगी व्यासपीठावर उपस्थित होते.

‘महिला सबलीकरण : सद्यस्थिती व आव्हाने’ या विषयावर आपले परखड मत व्यक्त करताना सौ. शेवाळे पुढे म्हणाल्या की, आजच्या विज्ञान तंत्रज्ञानाच्या युगात देखील अजूनही देशातील तमाम महिला वर्गास आपल्या न्याय हक्कासाठी झगडावे लागणे दुर्दैव आहे. पुरुषप्रधान संस्कृतीचा पगडा अजूनही आपल्या समाजव्यवस्थेवर असून तो बदलण्यासाठी इच्छाशक्ती असणे आवश्यक आहे. आजच्या काळामध्ये स्त्री ही पुरुषांच्या तुलनेत कुठेच मागे नसून तिचा आत्मसन्मान जागृत झालेला आहे. तो प्रत्येकाने जपणे गरजेचे असल्याचेही भारती शेवाळे म्हणाल्या. जुन्या काळापासून चालत आलेला स्त्रीकडे बघण्याचा पारंपारिक दृष्टिकोन आजच्या काळात जरी बदलला असला तरी स्त्रियांचे विविध प्रश्न, तिच्या व्यथा व वेदना अजूनही समूळ नष्ट झालेल्या नाहीत. यापुढील काळात जास्तीत जास्त महिला वर्गाने उच्चशिक्षित होऊन आपल्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी स्वतःच पुढाकार घेण्याचे आवाहनही त्यांनी याप्रसंगी केले.

प्रस्तुत महिला सबलीकरण कार्यशाळेत ‘महिला अत्याचार विरोधी कायदे’ या विषयावर तळेगाव ढमढेरे- शिक्रापूर पोलीस स्टेशनच्या पोलीस उपनिरीक्षक माधुरी झेंडगे यांनी विद्यार्थ्यांना विस्तृत स्वरूपाचे मार्गदर्शन केले. समाजात कोणत्याही भूमिकेत वावरत असताना महिलांनी निर्भीड बनणे आणि येणाऱ्या संकटांना आत्मविश्वासाने सामोरे जाणे ही आजच्या काळाची आवश्यकता आहे. प्रतिकूल परिस्थितीवर मात करून जिद्द, मेहनत आणि आत्मविश्वासाच्या बळावर यशाला गवसणी घालता येत असल्याचे पोलीस उपनिरीक्षक झेंडगे यांनी विद्यार्थ्यांना सांगितले. विद्यार्थिनींनी उच्चशिक्षण घेत असताना आणि समाजात कोणत्याही भूमिकेत वावरत असताना सजग असणे गरजेचे असते. आजूबाजूला काय सुरू आहे व कोणती व्यक्ती कोणत्या भावनेतून आपल्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करते याबाबत विद्यार्थिनींनी सावध असायला हवे. समाजात महिलांवरील अत्याचारांचे व अन्यायाचे प्रमाण वाढत असताना सोशल मीडिया प्रत्येकाने जबाबदारीने हाताळणे गरजेचे असल्याचेही पोलीस उपनिरीक्षक माधुरी झेंडगे यांनी सांगितले. महिला अत्याचार विरोधी कायदे सक्षम असून या कायद्याचे ज्ञान महाविद्यालयीन युवक युवतींना असणे गरजेचे असल्याचेही त्या म्हणाल्या. शालेय व महाविद्यालयीन जीवनात विद्यार्थ्यांनी करियर आणि अभ्यासावरच लक्ष केंद्रित करणे गरजेचे असून योग्य वयात कठोर मेहनत घेतली तर हमखास यश मिळत असल्याचेही पोलीस उपनिरीक्षक माधुरी झेंडगे यावेळी म्हणाल्या.

शिक्षण प्रसारक मंडळ व विद्या सहकारी बँकेचे संचालक महेशबापू ढमढेरे यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले. शिक्षण प्रसारक मंडळाच्या सर्व शाखांमध्ये विद्यार्थिनींचे शिक्षण घेण्याचे प्रमाण जास्त असून येथील सुरक्षिततेच्या वातावरणात निर्भयपणे मुली उच्चशिक्षित होऊन बाहेर जात आहेत. शिक्षण प्रसारक मंडळाच्या दृष्टीने ही गौरवाची बाब असून महिला वर्गास सन्मान देण्याची परंपरा येथे सुरू असल्याचे गौरवोदगार त्यांनी याप्रसंगी काढले. २१व्या शतकामध्ये सामाजिक, राजकीय, आर्थिक व सांस्कृतिक क्षेत्रांसह इतरही विविध क्षेत्रांमध्ये आपल्या भारतीय महिला कौतुकास्पद कामगिरी करत आहेत. देशाच्या जडणघडणीमध्ये महिला वर्गाचे योगदान बहुमूल्य असल्याचेही महेशबापू ढमढेरे यावेळी म्हणाले. समाजातील सर्वच घटकांसाठी शिक्षण प्रसारक मंडळ सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून विविध उपक्रम राबवित असल्याचेही त्यांनी सांगितले.

प्रस्तुत महिला सबलीकरण कार्यशाळेचे केंद्र कार्यवाह डॉ. दत्तात्रय कारंडे यांनी प्रास्ताविक केले. तर प्रा. अश्विनी पवार यांनी सूत्रसंचालन केले. प्रस्तुत कार्यशाळेस महाविद्यालयातील बहुतांश युवक युवती व शिक्षक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here
Captcha verification failed!
CAPTCHA user score failed. Please contact us!

ताज्या बातम्या