पुणे: पुणे जिल्हा परिषद सार्वत्रिक निवडणुकीचे बिगुल वाजल्यानंतर आता खऱ्या अर्थाने राजकीय आखाडा तापला आहे. शिरूर तालुक्यातील अत्यंत प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या तळेगाव ढमढेरे जिल्हा परिषद गटात राजकीय समीकरणांनी अनपेक्षित वळण घेतले आहे. भाजपचे तालुकाध्यक्ष जय शिंदे यांच्या पत्नी रेश्मा शिंदे यांनी अपक्ष शड्डू ठोकल्याने या गटात आता चौरंगी लढत होणार असून, प्रस्थापितांची झोप उडाली आहे.
बड्या नेत्यांची मनधरणी ठरली निष्फळ
अर्ज माघारीच्या दिवशी तळेगाव ढमढेरे गटात मोठा ‘राजकीय ड्रामा’ पाहायला मिळाला. भाजपचे अधिकृत उमेदवार रिंगणात असताना, स्वपक्षाच्या तालुकाध्यक्षांनीच बंडखोरी केल्याने भाजपच्या गोटात खळबळ माजली होती. राज्य पातळीवरील अनेक आजी-माजी मंत्री आणि जिल्हा कार्यकारिणीने जय शिंदे यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, “केलेल्या कामाच्या जोरावर जनता मला यश देईल,” असा ठाम विश्वास व्यक्त करत शिंदे निवडणुकीच्या रिंगणात कायम राहिल्याने भाजपसमोर पेच निर्माण झाला आहे.
रिंगणातील प्रमुख ‘रणरागिणी’
या गटात दिग्गज घराण्यांमधील महिला उमेदवारांमध्ये थेट लढत होत आहे:
१. रेखा मंगलदास बांदल (राष्ट्रवादी काँग्रेस): माजी जिल्हा परिषद सदस्य मंगलदास बांदल यांच्या पत्नी पुन्हा एकदा नशीब आजमावत आहेत.
२. दिपाली राहुल गव्हाणे (भाजपा): माजी आमदार बापू पठारे यांची कन्या मैदानात असल्याने भाजपसाठी ही जागा प्रतिष्ठेची आहे.
३. सारिका राहुल करपे (शिवसेना – शिंदे गट): महायुतीमधील मित्रपक्ष असलेल्या शिंदे गटानेही आपली ताकद पणाला लावली आहे.
४. रेश्मा जयेश शिंदे (अपक्ष): भाजप तालुकाध्यक्षांच्या पत्नीने बंडखोरी केल्याने या तिरंगी लढतीचे रूपांतर आता चौरंगी लढतीत झाले आहे.
तळेगावकरांच्या वाटेला निराशा; स्थानिक उमेदवाराचा अभाव
तळेगाव ढमढेरे हे तालुक्याच्या बाजारपेठेतील महत्त्वाचे केंद्र आणि मोठी लोकसंख्या असलेले गाव आहे. गेल्या अनेक वर्षांपासून निवडणूक रखडलेली असल्याने यावेळी तळेगाव ढमढेरे गावातूनच एखादा स्थानिक उमेदवार दिला जाईल, अशी अपेक्षा ग्रामस्थांना होती. मात्र, प्रमुख राजकीय पक्षांनी तळेगावच्या स्थानिक कार्यकर्त्यांना डावलल्याने ग्रामस्थांमध्ये काहीशी नाराजी पाहायला मिळत आहे.
कोणाची किमया चालणार?
लोकसंख्येच्या दृष्टीने मोठे मतदान असलेल्या तळेगाव ढमढेरे गावातील मतदार आता कोणाच्या पाठीशी उभे राहतात, यावर संपूर्ण निकालाचे गणित अवलंबून आहे. एका बाजूला राष्ट्रवादीचा बालेकिल्ला राखण्याचे आव्हान, दुसऱ्या बाजूला भाजपची प्रतिष्ठा आणि तिसऱ्या बाजूला जय शिंदे यांनी निर्माण केलेले अपक्ष उमेदवारीचे आव्हान; यामुळे या निवडणुकीत कोण बाजी मारणार, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
थोडक्यात पण महत्त्वाचे:
“तळेगाव ढमढेरे गटातील ही लढत केवळ सत्तेसाठी नसून, ती अस्तित्वाची लढाई बनली आहे. जय शिंदे यांच्या बंडखोरीचा फटका कोणाला बसणार आणि तळेगावकर ‘स्थानिक’ मुद्द्यावर काय भूमिका घेणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.”
