टाकळी हाजी | प्रतिनिधी
पुणे जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर टाकळी हाजी गटात यावेळी चौरंगी लढत पाहायला मिळणार असून निवडणूक अत्यंत चुरशीची ठरण्याची चिन्हं आहेत. चार प्रमुख पक्षांचे उमेदवार रिंगणात उतरल्याने या गटाकडे संपूर्ण तालुक्याचं लक्ष लागलं आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून दामू घोडे, भारतीय जनता पार्टीकडून राजेंद्र गावडे, शिवसेनेकडून डॉ. सुभाष पोकळे, तर उबाठा गटाकडून बाळासाहेब डांगे हे उमेदवार निवडणुकीच्या मैदानात आमनेसामने आहेत.
या निवडणुकीला विशेष महत्त्व प्राप्त झालं आहे ते म्हणजे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून उमेदवारी नाकारल्यानंतर राजेंद्र गावडे यांनी भाजपमध्ये प्रवेश करत थेट निवडणूक रिंगणात उडी घेतली. या घडामोडीमुळे टाकळी हाजी गटातील राजकीय समीकरणं बदलली असून लढतीत अधिक रंगत आली आहे.
चारही उमेदवारांकडून जोरदार प्रचार सुरू असून गावागावात बैठका, संपर्क मोहिमा आणि कार्यकर्त्यांची फौज मैदानात उतरली आहे. विकास, स्थानिक प्रश्न आणि नेतृत्व या मुद्द्यांवरून प्रचारात आरोप-प्रत्यारोप होताना दिसत आहेत.एकूणच टाकळी हाजी गटातील ही निवडणूक अत्यंत लक्षवेधी ठरणार असून, अंतिम निकालाकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे.

