Homeइतरगुलजार पुणे आणि सुंदर बालभारतीचा चैतन्यमय व प्रेरणादायी प्रवास

गुलजार पुणे आणि सुंदर बालभारतीचा चैतन्यमय व प्रेरणादायी प्रवास

महाराष्ट्रातील प्रसिद्ध साहित्यिक माधव राजगुरू यांचे मराठी साहित्यात मोठे योगदान आहे. किशोर मासिकाचे माजी कार्यकारी संपादक व महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळाचे माजी विशेषाधिकारी अशी मोठी पदे सांभाळलेले राजगुरू हे आता सध्या अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संस्थेचे अध्यक्ष आहेत. महाराष्ट्रातील विविध नामवंत साहित्य संस्थांचे त्यांना अनेक पुरस्कार देखील प्राप्त आहेत. गुलजार पुणे आणि सुंदर बालभारती या पुस्तकातून त्यांनी आपला अनुभव कथन केला आहे. पुस्तक निर्मितीची प्रक्रिया कशा प्रकारे चालते? त्यात कोणत्या प्रकारच्या अडचणींना सामोरे जावे लागते? या सर्व गोष्टी त्यांनी आपल्या अनुभवातून वाचकांपुढे मांडलेल्या आहेत.

माधव राजगुरू यांचा सुरुवातीपासूनचा प्रवासच खडतर होता. अगदी एखाद्या मराठी चित्रपटाची स्टोरी शोभावी असं त्यांचं आत्मकथन आजच्या तरुणांना निश्चितच मार्गदर्शक दीपस्तंभ आहे.

शहरात काम करण्याचं प्रत्येकाचं स्वप्न असतं. तसंच स्वप्न लेखकानेही पाहिले होते. सोलापूर येथील छोट्याशा खेडेगावातून आलेल्या राजगुरू यांनी 72 च्या भयानक दुष्काळात गावातून बाहेर जात पुण्यात पाऊल टाकल्यानंतर पुणे स्टेशन जवळील लक्ष्मी विलास हॉटेल येथे वयाच्या 19 व्या वर्षी वेटरचं काम करत जिद्दीने शिक्षण पूर्ण करून 1986 मध्ये आबासाहेब गरवारे महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून रुजू झाले. मुळातच बालपणापासून वाचनाची आवड असल्याने त्यांनी अध्यापनाचे काम करत असताना अवांतर वाचन सुरू करून विद्यार्थ्यांसाठी अनेक संदर्भ ग्रंथ हाताळले. याच विद्यालयातील मराठी विभाग प्रमुख प्राध्यापक प्रभाकर तामणे यांनी त्यांच्यावर वाचण्यासाठी बंदी आणली. ही गोष्ट लेखकासाठी क्लेशदायक होती. असं म्हणतात नकारात्मक विचार करणाऱ्याला कुठल्याही औषधाने बरे वाटत नाही आणि सकारात्मक विचार करणाऱ्याला कुठलेही विष मारू शकत नाही. लेखक सकारात्मक विचारांचा असल्याने प्रत्येक कठीण परिस्थितीत तो मार्ग काढत गेला. त्यामुळे आजच्या तरुणांना राजगुरू यांचे आत्मकथन निश्चितच प्रेरणादायी आहे.

बालभारती पाठ्यपुस्तके हा सगळ्यांचा जिव्हाळ्याचा विषय. मनाच्या एका कोपऱ्यात या पाठ्यपुस्तकांचे धडे आणि कविता कोरलेले असतात. बालभारतीत काम करताना लेखकाला अनेक चांगले वाईट अनुभव आले. पाठ्यपुस्तक निर्मितीची काम कशाप्रकारे चालते याचा लेखाजोखा या आत्मकथनात अत्यंत प्रभावीपणे मांडला आहे. बालभारती मधील कर्मचारी व तज्ञ यांना घेऊन काम करणे म्हणजे तारेवरची कसरत. परंतु ही किमया अत्यंत प्रभावीपणे लेखकाने साधली आहे. पाठ्यपुस्तक निर्मितीचे काम अत्यंत जोखमीचे असते. एखादे चांगले काम झाले तर सर्वत्र कौतुक होते मात्र थोडी जरी दिरंगाई झाली किंवा कामात कसूर झाला तर प्रसार माध्यमांच्या टीकेला सामोरे जावे लागते. अशावेळी काही मंडळी याचा गैरफायदा घेऊन त्याचा उपयोग आपल्या प्रसिद्धीसाठीही करतात. आशा अनेक प्रसंगांचा त्यांनी यात आढावा घेतला आहे. यातून सुजन वाचकाला बरेच काही शिकायला मिळते व नवीन गोष्टीची माहिती होते. लेखकाने मात्र बालभारतीत काम करत असताना प्रामाणिकपणे आपली जबाबदारी पार पाडत योग्य लेखकांनाच पाठ्यपुस्तकात संधी दिली आहे. आत्मकथनातील इतर पात्रही मनाला स्पर्श करून जातात.

पुणे येथील उत्कर्ष प्रकाशनाने या पुस्तकाची साजेशी बांधणी केली आहे. पुस्तकाची गुणवत्ता आणि पानांचा दर्जा त्यांनी केलेल्या मेहनतीची साक्ष देतो. प्रसिद्ध चित्रकार माननीय श्री. सुरेश नावडकर, यांनी विषयाला अनुरूप काढलेले आकर्षक मुखपृष्ठ पुस्तकाच्या उंचीत मोलाची भर टाकते. मंत्री शालेय शिक्षण तथा अध्यक्ष महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक मंडळ माननीय प्रा. वर्षा गायकवाड यांनी या पुस्तकासाठी शुभेच्छा दिल्या आहेत तर नांदेड जिल्ह्यातील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे माझी कुलगुरू डॉ. पंडित विद्यासागर यांनी या पुस्तकासाठी अभ्यासपूर्ण प्रस्तावना दिली आहे. मा. श्री. माधव राजगुरू यांना पुढील साहित्यिक वाटचालीसाठी मनापासून हार्दिक शुभेच्छा..!

*पुस्तकाचे नाव* – गुलजार पुणे आणि सुंदर बालभारती*लेखक* – मा. श्री. माधव राजगुरू*प्रकाशक* – उत्कर्ष प्रकाशन पुणे*पृष्ठे* – 120*मूल्य* – 150 रु.*मुखपृष्ठ-* – सुरेश नावडकर*

समीक्षक -सचिन बेंडभर

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here
Captcha verification failed!
CAPTCHA user score failed. Please contact us!

ताज्या बातम्या